---Advertisement---

बीडचे विद्रुपीकरण थांबवा! अपघातांना आमंत्रण देणारी बॅनरबाजी बंद करा

On: December 29, 2025 2:42 PM
Follow Us:
---Advertisement---

होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ तातडीने राबवा – डॉ. गणेश ढवळे

नगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त नागरिकांची जोरदार निदर्शने

बीड | दि. २९ – बीड शहर सध्या अनधिकृत बॅनर, फ्लेक्स व होर्डिंग्जच्या विळख्यात सापडले असून शहराचे सौंदर्य पूर्णतः विद्रुप झाले आहे. प्रमुख बाजारपेठा, मुख्य रस्ते, चौक, सिग्नल, विजेचे खांब तसेच रस्त्यांच्या दुभाजकांवर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी हे बॅनर रस्त्यावर झुकलेले असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

शहर स्वच्छता, सौंदर्यीकरण व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, कारवाईअभावी अनधिकृत बॅनरबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ बीडमध्ये तातडीने राबवावा या ठाम मागणीसाठी आज नगरपरिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनसामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. “बीडचे विद्रुपीकरण थांबवा, बॅनरबाजी बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. निदर्शकांनी नगरपरिषदेच्या उदासीन भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. बीड शहरात बॅनरबाजीविरोधात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

⚖️ न्यायालयाच्या आदेशाची थेट अवमाननाराज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांना शहर बॅनरमुक्त ठेवण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने दरवर्षी पालिकांकडून न्यायालयात शपथपत्रही सादर केले जाते. मात्र प्रत्यक्षात बीड शहरात बॅनरमुक्ती केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.हे प्रकार म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची थेट अवमानना असून याला नगरपरिषदेचे प्रशासन व मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला.

🚫 ‘नाशिक पॅटर्न’ का आवश्यक?डॉ. गणेश ढवळे यांनी यावेळी नाशिक पॅटर्नचे उदाहरण देत ठाम भूमिका मांडली. नाशिक शहरात अनधिकृत बॅनर व होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरोधात थेट बॅनरवर झळकलेल्या व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्यात आले. आतापर्यंत २१ पेक्षा अधिक गुन्हे नोंदविण्यात आले असून हा पॅटर्न राज्यभर कौतुकास्पद ठरला आहे.“केवळ बॅनर काढून टाकणे पुरेसे नाही. बॅनर लावणारे, छापणारे व त्यावर नाव झळकवणारे यांच्यावर थेट गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तेव्हाच बॅनरबाजीला आळा बसेल,” असे स्पष्ट मत डॉ. ढवळे यांनी व्यक्त केले.

🏛️ नवनिर्वाचितांची सत्तेची धुंदी?बीड नगरपरिषद निवडणुकीत जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारताच नियमांना हरताळ फासल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. सर्वपक्षीय विजयी उमेदवारांनी शहरभर लावलेल्या अभिनंदनाच्या बॅनरमुळेच हा गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.जनतेच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, “आमदार-नगरसेवकांसाठी वेगळे नियम आणि नागरिकांसाठी वेगळे नियम का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

👥 आंदोलनात कोण सहभागी?या आंदोलनात विविध सामाजिक, कामगार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्येशेख युनुस, शिवशर्मा शेलार, शेख मुबीन, शेख मुस्ताक, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष – इंटक, बीड), आर. आर. जाधव, डी. जी. तांदळे (महाराष्ट्र राज्य किसान सभा, बीड जिल्हाध्यक्ष), नितीन जायभाये (अध्यक्ष – बीड शहर बचाव मंच), अ‍ॅड. नितीन वाघमारे, रुक्मिणी नागापुरे आदी सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

🔴 नागरिकांचा इशाराजर तातडीने अनधिकृत बॅनर हटवले गेले नाहीत, दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत आणि ‘नाशिक पॅटर्न’ची अंमलबजावणी झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

बीड शहराचे सौंदर्य, सुरक्षितता आणि कायद्याचा सन्मान राखण्यासाठी प्रशासन जागे होणार का? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महत्वाच्या बातम्या

कपिलधार देवस्थानात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह उधळलाAHTU च्या धडक कारवाईत मुलगी ताब्यात; ८ आरोपींसह ५०-६० वऱ्हाडींवर गुन्हा दाखल

दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची कडक नजर; गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश

‘हीच खरी समाजसेवा’ – अपघातग्रस्ताला जीवदान देणाऱ्या ढाकणे दाम्पत्याचा गौरव

बेपत्ता राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ

बीड शहरात पुन्हा खून; अंकुश नगर परिसरात दुपारी तरुणाची हत्या, शहरात खळबळ

ज्ञानराधा मल्टिस्टेट प्रकरणात प्रशासन आक्रमक; 27 मालमत्तांच्या जप्तीसाठी न्यायालयात धडक

Leave a Comment