शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी शिवारात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी, मेंढपाळ आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने मेंढपाळाच्या घोड्यावर हल्ला करून त्याचा प्राण घेतल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी सकाळी शेतात काम करत असताना दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याचा दावा एका शेतमजुराने केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दाव्यामुळे फुलसांगवीसह आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
शनिवारी मध्यरात्री फुलसांगवी शिवारात अज्ञात हिंस्र प्राण्याने मेंढपाळाच्या घोड्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू झाला असून, त्याचे मांस भक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. घोड्याच्या शरीरावर खोल जखमा, ओरखडे आणि मांस खाल्ल्याचे अवशेष आढळल्याने हा हल्ला बिबट्याचाच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
शेतमजुराचा दावा आणि भीतीत वाढ
ही घटना विस्मरणात जाण्याआधीच सोमवारी सकाळी श्रीरंग लोणके नावाच्या शेतमजुराने दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याचा दावा केला. नामदेव दिनकर खेडकर यांच्या शेतात सकाळच्या सुमारास दारे धरत असताना उसाच्या फडामध्ये दोन बिबट्यासदृश प्राणी दिसल्याचे त्यांनी सांगितले. हे प्राणी क्षणार्धात उसाच्या फडात लपल्याचेही त्यांनी नमूद केले.या घटनेची माहिती गावात पसरताच फुलसांगवी व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीने घर केले आहे. अनेक शेतकरी सकाळी लवकर किंवा संध्याकाळनंतर शेतात जाणे टाळत असून, महिलांमध्ये व मेंढपाळांमध्ये विशेषतः भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाची तातडीची हालचाल
या घटनेची माहिती मिळताच बीड विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः घटनास्थळी भेट दिली. त्यांनी स्थानिक शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने कथित बिबट्याच्या वावराच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली आहे.शेतमजुराच्या सांगण्यानुसार ज्या उसाच्या फडामध्ये बिबट्याचा वावर असल्याची शक्यता आहे, त्या परिसरात वनविभागाकडून तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे बिबट्याचा वावर आहे की नाही, याची खात्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तपास मोहिमेत कोण सहभागी?
या संपूर्ण मोहिमेत मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे (बीड), वनरक्षक दादासाहेब जोशी, वनमजूर सोपान येवले, सतीश गर्जे, लवांडे तसेच वन्यप्राणी मित्र युवराज पाटील हे सहभागी झाले आहेत. शेतमजुराने पाहिलेल्या बिबट्याच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी वनविभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिबट्याच्या अस्तित्वाबाबत अधिकृत दुजोरा नाही
शिरूर कासार तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाचे अधिकारी मान्य करतात. मात्र, ज्या ठिकाणी घोड्यावर हल्ला झाला, त्या ठिकाणी बिबट्याचे अस्तित्व असल्याचा अधिकृत दुजोरा देण्यास वनविभाग सध्या टाळाटाळ करत आहे. घोड्यावर झालेला हल्ला बिबट्याचाच असण्याची शक्यता नाकारली जात नसली, तरी खात्रीशीर निष्कर्षासाठी ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद होणे किंवा मृत घोड्याच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.त्यामुळे परिसरात दहशत असली, तरी बिबट्याच्या वावराबाबत अधिकृत घोषणा होण्यासाठी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अफवांमुळे वाढलेले तणाव
गेल्या पंधरा दिवसांपासून शिरूर कासार तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, ज्या-ज्या ठिकाणी असे दावे करण्यात आले, त्या ठिकाणी वनविभागाला अधिकृतरीत्या बिबट्या आढळलेला नाही. सोशल मीडियावरील व्हिडीओ, फोटो आणि तोंडी चर्चांमधून अफवा वेगाने पसरत असल्याने वनविभागाला वारंवार घटनास्थळी धाव घ्यावी लागत आहे.प्रत्यक्षात बिबट्या न आढळल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होत असून, या अफवांमुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.
भयभीत न होता सतर्क राहण्याचे आवाहन
फुलसांगवी परिसरात बिबट्यासदृश हिंस्र प्राण्याने घोड्यावर हल्ला केल्याची घटना गंभीर असली, तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. शक्यतो रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे, एकटे न जाता समूहाने काम करावे तसेच कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे यांनी केले आहे.








