बीड : एरवी विविध वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत असणारा बीड जिल्हा यंदा मात्र एका सकारात्मक आणि अभिमानास्पद कामगिरीमुळे राज्यभर चर्चेत आला आहे. माजी सैनिकांचे पुनर्वसन, त्यांच्या कुटुंबीयांचे हितसंबंध तसेच सैनिकी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी गोळा करण्यात येणाऱ्या ध्वजदिन निधी संकलनात बीड जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक निधी जमा करत विक्रमी कामगिरी केली आहे.
जिल्ह्याला यंदा ३९ लाख ५० हजार रुपये इतके ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र बीड जिल्ह्यातील नागरिक, शासकीय-निमशासकीय यंत्रणा, विविध संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे हे उद्दिष्ट तब्बल ३३५ टक्क्यांनी ओलांडत एक कोटी ३२ लाख ३० हजार रुपये इतका निधी संकलित करण्यात आला. ही कामगिरी राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन राजभवनाकडून बीड जिल्ह्याचा विशेष गौरव करण्यात आला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याच कार्यक्रमात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे (निवृत्त) यांचाही योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
ध्वजदिन निधी हा देशासाठी सेवा बजावलेल्या सैनिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आधार मानला जातो. या निधीतून माजी सैनिकांचे पुनर्वसन, विधवा व अवलंबित कुटुंबीयांना आर्थिक मदत, अपंग सैनिकांचे उपचार, तसेच सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाय्य दिले जाते. त्यामुळे या निधी संकलनात नागरिकांचा सहभाग हा सामाजिक जाणीवेचे प्रतीक मानला जातो.
७ डिसेंबर हा दिवस ‘ध्वजदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात ध्वजदिन निधी संकलन मोहिमेला सुरुवात होते आणि ही मोहीम पुढील वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत चालते. या कालावधीत विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा, आवाहने आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून निधी संकलन केले जाते.
बीड जिल्ह्यात प्रशासनाने राबवलेल्या प्रभावी नियोजनामुळे आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील समन्वयामुळे हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने घेतलेले प्रयत्न, विविध विभागांचा सहभाग आणि सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ही कामगिरी शक्य झाली.
एरवी नकारात्मक कारणांसाठी चर्चेत राहणारा बीड जिल्हा देशसेवक सैनिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारा, संवेदनशील आणि सामाजिक भान जपणारा जिल्हा म्हणून पुढे आला आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या प्रतिमेला सकारात्मक उजाळा मिळाला असून, आगामी काळातही अशाच सामाजिक उपक्रमांतून बीड जिल्हा मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







