Yogesh Kadam On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी राज्यातील लहान मुलं पळवण्याच्या टोळ्यांबाबत आणि लहान मुलं बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. या मुद्यांवर विधीमंडळात चर्चा करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्या या पत्राला आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं आहे. तसेच जेव्हा लहान मुलं हरवतात किंवा बेपत्ता होतात तेव्हा त्यांचा तपास घेण्यासाठी आपण विशेष मोहीम राबवतो. पण हा विषय गंभीर आहे, असं योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
योगेश कदम काय म्हणाले?
“राज ठाकरे यांनी काय पत्र लिहिलं मला माहिती नाही. पण लहान मुले अचानक हरवण्याच्या काही बातम्या आम्ही देखील पाहिल्या आहेत. मी या ठिकाणी एक आवर्जून सांगतो की जेव्हा लहान मुलं हरवतात. तेव्हा त्यांचा तपास करण्यासाठी आपण विशेष तपास योजना राबवतो. या विशेष मोहिमांच्या दरम्यान हे लक्षात येतं की अनेकांच्या मिसिंग तक्रारी दाखल नसतानाही त्यांना आपण शोधून काढलेलं आहे”, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
“जेव्हा अशा केसेस घडतात तेव्हा ९० टक्क्यांपेक्षा जास्त मुले आपल्याला परत सापडतात. त्यातील काही मुले हे स्वत:हून निघून गेलेली असतात, किंवा आणखी काही वेगळ्या कारणांनी गेलेली असतात. यातील ९० टक्के मुले पुन्हा सापडतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्ही उरलेल्या १० टक्के मुलांना शोधत नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम आम्ही राबवतो. या विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत. हा विषय नक्कीच गंभीर आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात नक्कीच उपाययोजना राबवलेल्या आहेत”, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलं?
“एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३० टक्क्यांनी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही”, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
“लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही?”, असे सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारले आहेत.
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत, यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे, खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही! असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.







