परळी नगर परिषदेच्या २०२५ च्या निवडणूक निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून परळीची बदनामी होत असल्याचा आरोप करत “परळीची जनता मतपेटीतून उत्तर देईल” असा विश्वास धनंजय मुंडेंनी प्रचारसभांमध्ये व्यक्त केला होता. आज जाहीर झालेल्या निकालांमधून परळीकरांनी तो विश्वास सार्थ ठरवलेला स्पष्टपणे दिसतो आहे. कारण परळी नगर परिषद पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या ताब्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिसऱ्या क्रमांकाचे स्टार प्रचारक म्हणून मान मिळालेला असतानाही धनंजय मुंडेंना राज्यात अन्यत्र कुठल्याही मोठ्या प्रचारसभांसाठी बोलावण्यात आले नाही. बीड जिल्ह्यातही परळी वगळता त्यांनी इतर ठिकाणी सभा घेतल्या नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवरही परळी नगर परिषदेचा संपूर्ण डाव धनंजय मुंडेंनी स्वतःच्या खांद्यावर पेलला आणि निकालातून आपलं नेतृत्व पुन्हा सिद्ध केलं.कोपरा सभा, पारावरच्या बैठका आणि थेट जनतेशी संवादमोठ्या व्यासपीठांऐवजी धनंजय मुंडेंनी यावेळी वेगळी रणनीती अवलंबली. परळीत त्यांनी कोपरा सभा, पारावरच्या बैठका आणि छोट्या छोट्या जनसंवाद कार्यक्रमांवर भर दिला. जवळपास डझनभर सभांना हजेरी लावत त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. आपल्या भाषणांतून परळीच्या विकासकामांचा आढावा घेताना, शहराच्या बदनामीवरही त्यांनी ठाम भूमिका मांडली.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातत्यानं टीकेचे धनी ठरलेले धनंजय मुंडे राजकीय वर्तुळातही अनेकदा संशयाच्या नजरेनं पाहिले जात होते. संतोष देशमुख हत्याकांडातील वाल्मिक कराड कनेक्शनमुळे त्यांच्यावर झालेल्या मीडिया ट्रायलचा मुद्दा त्यांनी प्रचारसभांमध्ये थेट उपस्थित केला. “न्यायालयीन प्रक्रिया आणि सत्य समोर येईल,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी जनतेसमोर आपली बाजू मांडली.
अजित पवारांचा प्रचार, पण परळीची जबाबदारी मुंडेंकडेबीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी परळी वगळता जिल्ह्यातील इतर नगरपालिकांसाठी प्रचारसभा घेतल्या. मात्र परळी नगर परिषदेची सर्वस्वी जबाबदारी धनंजय मुंडेंवरच होती. कोणताही मोठा स्टार प्रचारक नसताना त्यांनी स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवली आणि त्याचा फायदा थेट निकालात दिसून आला.
यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह सर्वच उमेदवारांच्या पाठीशी परळीकर ठामपणे उभे राहिल्याचं चित्र समोर आलं आहे. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री आणि धनंजय मुंडेंच्या भगिनी पंकजा मुंडेंचीही परळीत त्यांना साथ लाभली होती.“नेतृत्व कामातून सिद्ध होतं” – निकालातून स्पष्ट संदेशया निकालानं एक गोष्ट अधोरेखित केली आहे की, सातत्यानं टीका होत असली तरी स्थानिक पातळीवर काम, संपर्क आणि विश्वास असेल तर जनता नेतृत्वावर शिक्कामोर्तब करते. धनंजय मुंडेंनी परळी नगर परिषदेच्या निकालातून हेच दाखवून दिलं आहे.
राजकीय विरोधकांसाठी हा निकाल निश्चितच धक्कादायक मानला जात आहे.बहिणीच्या मतदारसंघात मान राखत गंगाखेडमध्ये जल्लोषपरळीतील विजयाचा आनंद साजरा करतानाच धनंजय मुंडेंनी आपला शब्दही पाळला. परळीचा निकाल लागल्यानंतर ते थेट परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये दाखल झाले. कारण गंगाखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी त्यांची बहीण उर्मिला केंद्रे या उमेदवार होत्या.उर्मिला केंद्रेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर धनंजय मुंडेंनी दोन वेळा गंगाखेडमध्ये जाऊन प्रचार केला होता. एक रॅली आणि एक जाहीर सभा अशा माध्यमातून त्यांनी मतदारांना आवाहन केलं होतं.
अखेर उर्मिला केंद्रे विजयी झाल्यानंतर गंगाखेडच्या विकासासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली.आज परळी आणि गंगाखेड – दोन्ही ठिकाणच्या विजयाचं सेलिब्रेशन गंगाखेडमध्ये करण्यात आलं. बहिणीच्या विजयी मिरवणुकीत सहभागी होत धनंजय मुंडेंनी राजकीय परिपक्वता आणि मनाचा मोठेपणा दाखवला, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.परळीचा निकाल म्हणजे राजकीय उत्तरएकूणच परळी नगर परिषदेचा निकाल हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा विजय नसून, धनंजय मुंडेंनी आपल्या विरोधकांना आणि टीकाकारांना दिलेलं राजकीय उत्तर मानलं जात आहे.
पुढील काळात बीड जिल्ह्यातील राजकारणावर या निकालाचा नेमका काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.









