नागपूर : भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे शनिवारी नागपूर येथील विधानभवनात आले असताना ओळख न पटल्याने सुरक्षारक्षकांशी त्यांचा वाद झाल्याची घटना घडली.
विधानभवन परिसरात खासदार व आमदारांना मीडिया स्टॅन्डवर उभे राहून माध्यमांशी संवाद साधण्याची परवानगी असते. मात्र, सुरक्षारक्षकांनी खासदार प्रशांत पडोळे यांना ओळखले नसल्याने त्यांना अडवले. यावर खासदारांनी आक्षेप घेत हटकले असता दोन्ही बाजूंमध्ये काही काळ वाद निर्माण झाला.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच हस्तक्षेप करण्यात आला. त्यानंतर संबंधित सुरक्षारक्षकांनी खासदार प्रशांत पडोळे यांची माफी मागितली. माफीनंतर वाद निवळला आणि वातावरण शांत झाले.
यानंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. विधानभवनातील सुरक्षाव्यवस्था अधिक समन्वयाने आणि जबाबदारीने राबवावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.







