स्टोरी बीड| प्रतिनिधी बीड
कपिलधार देवस्थान, ता. जि. बीड येथे सुरू असलेला १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) च्या तत्पर कारवाईमुळे उधळून लावण्यात आला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी AHTU च्या प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना फोनद्वारे माहिती दिली की, दुपारी १२ वाजता कपिलधार देवस्थान येथे १६ वर्षांच्या मुलीचा विवाह लावण्यात येणार आहे.
माहिती मिळताच पो.उप.नि. पल्लवी जाधव या AHTU पथकासह व सामाजिक कार्यकर्त्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. देवस्थान परिसरात एकाच वेळी दोन-तीन विवाह सुरू असून मोठी गर्दी असल्याने पथकाने पहिल्या हॉलमध्ये प्रवेश केला.
तेथे चौकशीदरम्यान एका महिलेकडून मुलीचे नाव चुकीचे सांगण्यात आले; मात्र आडनाव अचूक सांगितल्याने संशय बळावला. पोलिस मुलीला ताब्यात घेण्याच्या तयारीत असतानाच वऱ्हाडी मंडळींना पोलिसांची चाहूल लागताच एकच गोंधळ उडाला. गर्दीचा फायदा घेत नवरदेव पळून गेला, मात्र पो.उप.नि. पल्लवी जाधव यांनी प्रसंगावधान राखत अल्पवयीन मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले.
यानंतर उपस्थित व पळणाऱ्या लोकांना थांबवत पल्लवी जाधव यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमाबाबत जनजागृती व कायदेशीर मार्गदर्शन केले. पीडित मुलीला विश्वासात घेऊन समुपदेशन करण्यात आले. चौकशीत मुलीने सांगितले की, तिचा विवाह राजेंद्र भाऊसाहेब शिंदे (वय २४, रा. पिंपळाची वाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) याच्याशी लावण्यात आला होता.
पीडित मुलगी, तिचे आई-वडील, मामा तसेच नवरदेव व त्याचे आई-वडील फरार झाल्याने नवरदेवाचे मामा व काही नातेवाईकांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे हजर करण्यात आले.
दरम्यान, बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकारी श्रीराम वीर (ग्रामपंचायत अधिकारी, पाली) यांना घटनेची माहिती देऊन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यांनी पीडित मुलगी व पालकांशी संवाद साधून माहिती घेतली.
या प्रकरणी पो.ठाणे बीड ग्रामीण गु.र.नं. ४३/२०२६, कलम ९, १० व ११ बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये
➡️ ८ मुख्य आरोपी,
➡️ ५० ते ६० वऱ्हाडी मंडळी,
➡️ तसेच देवस्थानचे ट्रस्टी व सदस्य
यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
AHTU च्या प्रभारी अधिकारी पल्लवी जाधव यांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या सुरक्षा, पुनर्वसन व समुपदेशनासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.







