माजलगाव | प्रतिनिधी
माजलगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर घडला असून, विकासाच्या नावावर सत्तेत असलेल्या गटाला मतदारांनी स्पष्ट नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवार महरीन शिफा बिलाल चाऊस यांनी सुमारे अडीच हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले आहे.
या निकालामुळे माजलगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.निवडणुकीपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांनी शहरासाठी २०० ते ३०० कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा करत जोरदार प्रचार केला होता. मात्र प्रत्यक्षात झालेल्या विकासकामांचा दर्जा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. निकृष्ट कामे, भ्रष्टाचाराला मिळालेले अप्रत्यक्ष पाठबळ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे मतदारांनी सोळंके गटाच्या उमेदवाराला थेट तिसऱ्या क्रमांकावर ढकलले.
हा निकाल म्हणजे सत्ताधाऱ्यांना मिळालेली स्पष्ट चपराक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.एकीचे बळ ठरले निर्णायकया निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दाखवलेली एकजूट निर्णायक ठरली.
माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या सून असलेल्या महरीन चाऊस यांनी शांत, मुद्देसूद आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार केला. महिलांचे प्रश्न, युवकांचा रोजगार, पाणीटंचाई, स्वच्छता आणि पारदर्शक कारभार हे मुद्दे त्यांनी प्रभावीपणे मांडले. पक्षातील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत काम केल्यामुळे हा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे.भाजप-शिवसेनेचा दारुण पराभवया निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांचा अक्षरशः सुपडा साफ झाला. अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या मेंडके यांना स्थानिक नेतृत्वाचा अभाव, संघटनात्मक कमजोरी आणि राज्यस्तरीय नेत्यांचे अपेक्षित पाठबळ न मिळाल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि प्रचारातील मर्यादा याचाही फटका बसल्याचे दिसून आले.भाजपला दिलासा देणारा एकमेव निकाल प्रभाग क्रमांक ४ मधून मिळाला. येथे दीपक मेंडके आणि त्यांच्या पत्नी रेश्मा मेंडके यांनी विजय मिळवला.
मात्र हा विजय पक्षापेक्षा त्यांच्या वैयक्तिक जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील कामामुळे मिळाल्याचे मानले जात आहे.नगरसेवक पदावर चुरस, दोन्ही राष्ट्रवादी गट समसमाननगरसेवक पदाच्या एकूण जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
दोन्ही गटांनी प्रत्येकी १० जागांवर विजय मिळवला असून नगरपालिकेत समसमान ताकद निर्माण झाली आहे. काँग्रेस, भाजप आणि एमआयएम या पक्षांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे, तर ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात नगरपालिकेतील सत्तासमीकरणे आणि निर्णयप्रक्रिया कशी घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रस्थापित नेत्यांना मतदारांचा नकारया निवडणुकीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मतदारांनी अनेक प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांना स्पष्ट नकार दिला आहे.
माजी नगराध्यक्ष सुमनबाई मुंडे आणि शेख मंजूर यांसारख्या अनुभवी नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे शेख मंजूर यांना अवघी १२७ मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले.
हा निकाल स्थानिक राजकारणातील बदलती मानसिकता आणि नव्या नेतृत्वाला मिळणारे प्राधान्य दर्शवतो.जनतेच्या अपेक्षा वाढल्यामहरीन चाऊस यांच्या विजयामुळे शहरातील नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. पारदर्शक कारभार, दर्जेदार विकासकामे, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची अपेक्षा आता जनतेकडून व्यक्त होत आहे. “विकास फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षात दिसायला हवा,” अशी भावना मतदारांमध्ये प्रकर्षाने दिसून आली.
माजलगावच्या राजकारणात नवे पर्वएकूणच माजलगाव नगरपालिकेच्या या निकालाने शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे. सत्तेचा माज आणि केवळ निधी आणल्याच्या दाव्यांवर मतदार समाधानी राहणार नाहीत, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. आगामी काळात महरीन चाऊस आणि त्यांची टीम जनतेच्या विश्वासाला कितपत पात्र ठरते, यावर माजलगावच्या विकासाची दिशा ठरणार आहे.








