अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी मोठा आणि निर्णायक बदल घडवून आणत शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर आपली मोहोर उमटवली आहे.
या निकालामुळे तब्बल २५ वर्षे नगरपालिकेवर वर्चस्व असलेल्या राजकिशोर मोदी यांच्या सत्तेला पहिल्यांदाच मोठा धक्का बसला आहे.नंदकिशोर मुंदडा यांनी एकूण २२,७७७ मते मिळवत आपल्या प्रतिस्पर्धी राजकिशोर मोदी यांचा पराभव केला. मोदी यांना २०,२८० मते मिळाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मुंदडा यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या सहाव्या फेरीपर्यंत कायम ठेवली. सहाव्या फेरीअखेर जवळपास २,५१० मतांचे मताधिक्य घेत मुंदडा यांनी दणदणीत विजय साकार केला.
ही लढत अंबाजोगाईच्या इतिहासातील सर्वाधिक लक्षवेधी आणि चुरशीची निवडणूक ठरली.विजयामागे मजबूत रणनीती आणि जनसंपर्कया विजयाचे खरे शिल्पकार स्वतः नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा आणि आमदार नमिता मुंदडा ठरले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
नंदकिशोर मुंदडा यांचा शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी असलेला जवळचा संपर्क, प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने धावपळ करण्याची त्यांची प्रतिमा आणि आबालवृद्धांशी असलेले आपुलकीचे नाते या विजयामागील महत्त्वाची कारणे ठरली.निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अक्षय मुंदडा यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती. मागील काळातील नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी पुरावे आणि मुद्देसूद मांडणीसह मतदारांसमोर ठेवली.
यामुळे मतदारांमध्ये बदलाची भावना अधिक तीव्र झाली आणि त्याचा थेट परिणाम निकालावर दिसून आला.भावनिक साद आणि विकासकामांचा प्रभावनंदकिशोर मुंदडा यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साद घातली होती. या सादेला शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह अनेक मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर आमदार नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून शहरात झालेली रस्ते विकासाची कामे, नळयोजना, घरकुल योजनेचा लाभ आणि राज्य शासनाची ‘लाडकी बहीण’ योजना या सर्व बाबी मुंदडा यांच्या विजयासाठी पूरक ठरल्या.राजकिशोर मोदींच्या पराभवाची कारणेराजकिशोर मोदी यांच्या पराभवामागे सलग २५ वर्षांची सत्ता आणि त्यातून निर्माण झालेली तीव्र अँटी-इन्कम्बन्सी हे प्रमुख कारण मानले जात आहे. नगर परिषद कारभारावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप प्रभावीपणे खोडून काढण्यात मोदी यांना अपयश आले. त्यातच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काही प्रमुख सहकाऱ्यांनी साथ सोडल्याचा फटका त्यांना बसला.
विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक १ मधून राजकिशोर मोदी यांचे सुपुत्र संकेत मोदी यांचा पराभव हा मोदी गटासाठी मोठा आणि धक्कादायक ठरला आहे. संकेत मोदी यांची ही पहिलीच निवडणूक होती, मात्र त्यातच त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.नगरसेवक निवडणुकीत चित्र उलटेनगराध्यक्ष पदावर नंदकिशोर मुंदडा यांनी विजय मिळवला असला, तरी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मात्र चित्र वेगळे दिसून आले. राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकविकास महाआघाडीने येथे बाजी मारली असून त्यांच्या गटाचे २० नगरसेवक निवडून आले आहेत.
दुसरीकडे, मुंदडा गटाला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे.२०१६ च्या निवडणुकीत याच्या अगदी उलट परिस्थिती होती. त्या वेळी नगराध्यक्ष पद मोदींकडे होते, तर मुंदडा गटाकडे सर्वाधिक नगरसेवक होते. यावेळी मात्र नगराध्यक्ष पद मुंदडा यांच्याकडे, तर बहुमत मोदी गटाकडे गेले आहे. त्यामुळे आगामी काळात नगर परिषदेचा कारभार चालवताना नंदकिशोर मुंदडा यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
मातब्बर नेत्यांना मतदारांचा नकारया निवडणुकीत अंबाजोगाईच्या मतदारांनी अनेक प्रस्थापित आणि प्रभावी नेत्यांना स्पष्ट नकार दिला आहे. प्रभाग १ मधून संकेत मोदी यांचा पराभव सर्वात धक्कादायक ठरला. प्रभाग ८ मधून तीन वेळा नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष असलेले बबनराव लोमटे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. प्रभाग ७ मधून माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा आणि दिलीप काळे, तर प्रभाग ३ मधून माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांचा पराभव शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
अंबाजोगाईत बदलाची स्पष्ट लाटएकूणच या निकालातून अंबाजोगाईत बदलाची लाट स्पष्टपणे दिसून आली आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या नेतृत्वाला मतदारांनी थेट आव्हान देत नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. आता नंदकिशोर मुंदडा नगराध्यक्ष म्हणून आणि बहुमत असलेल्या विरोधी गटासोबत समन्वय साधत शहराच्या विकासाची दिशा कशी ठरवतात, याकडे संपूर्ण अंबाजोगाईचे लक्ष लागले आहे.










