गेवराई | स्टोरी बीड प्रतिनिधी
गेवराई येथे सुरू असलेल्या पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला चौथ्या दिवशीही शेतकरी, युवक, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक शेतीची दिशा दाखवणारे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या संधींचे दालन ठरत असून रविवारपर्यंत तब्बल ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीविषयक माहिती, नव्या संकल्पना, यांत्रिकीकरण, सिंचन व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, शेतीपूरक उद्योग तसेच शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन यासंबंधी सखोल माहिती घेतली. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशीही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली असून, शेती क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेली उत्सुकता यामुळे स्पष्टपणे दिसून आली.
दरम्यान, आज या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात ११ प्रयोगशील व आदर्श शेतकऱ्यांना ‘कृषीरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांद्वारे शेतीत यशस्वी वाटचाल करणाऱ्या या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार असून, यानंतर या भव्य कृषी प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे प्रदर्शनग्रामीण भागातील लघु, मध्यम व अल्पभूधारक शेतकरी, युवक व महिला शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून या कृषी प्रदर्शनाची रचना करण्यात आली आहे.
शेतीतील अडचणी, उत्पादन खर्च, हवामान बदलाचे परिणाम आणि बाजारपेठेतील स्पर्धा यांचा विचार करून प्रदर्शनातील स्टॉल्स, मार्गदर्शन सत्रे व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्या कृषी प्रदर्शनात २२० हून अधिक नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारी उत्पादने व सेवा येथे उपलब्ध आहेत. आधुनिक शेती यंत्रसामग्री, ट्रॅक्टर व विविध अवजारे, उच्च प्रतीची बी-बियाणे, खते व कीडनाशके, ड्रिप व स्प्रिंकलर सिंचन प्रणाली, सोलर पंप, शेतीपूरक व्यवसाय, पशुसंवर्धन, तसेच शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांचा कलया प्रदर्शनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीच्या संकल्पनांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. स्मार्ट शेती, डिजिटल शेती सेवा, हवामान आधारित शेती नियोजन, कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या पद्धती याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ड्रिप, स्प्रिंकलर आणि सोलर पंपसारख्या प्रणालींबाबत थेट माहिती घेत खरेदीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.युवक शेतकऱ्यांचा या प्रदर्शनातील सहभाग लक्षणीय असून, शेतीकडे आधुनिक व्यवसाय म्हणून पाहण्याची मानसिकता वाढताना दिसून येत आहे.
महिला शेतकऱ्यांसाठीही बचत गट, शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि घरगुती व्यवसाय याबाबत विशेष माहिती देण्यात आली.१८ वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा विश्वासकिसान कृषी प्रतिष्ठानच्या वतीने गेवराई येथे गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, अद्ययावत माहिती आणि थेट कंपन्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली होती. आज हे प्रदर्शन राज्यातील एक आदर्श कृषी प्रदर्शन म्हणून ओळखले जात आहे.
प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासोबतच अनुभवांची देवाणघेवाण, यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा आणि शेतीतील नव्या संधींची जाणीव होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि दिशादर्शक असल्याची भावना व्यक्त केली आहे.शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक पाऊलराज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामुळे शेती क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, पारंपरिक शेतीतून आधुनिक व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती, कमी खर्चात अधिक उत्पादन आणि बाजाराभिमुख शेती या संकल्पना आत्मसात करण्यासाठी असे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
गेवराई येथील हे कृषी प्रदर्शन केवळ उत्पादने पाहण्यापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि भविष्यासाठीचा मार्ग दाखवणारे केंद्र ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.










