वडवणी| प्रतिनिधी २२ डिसेंबर २०२५
आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून, देशभरातील ५०० आकांक्षीत तालुक्यांमध्ये ११७ वा क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या संचालिका मा. सुमन चंद्रा यांनी वडवणी तालुक्याचा सखोल आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीला मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीचा उद्देश आकांक्षीत तालुका कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करणे तसेच पुढील टप्प्यातील उपाययोजना गावपातळीपर्यंत अधिक प्रभावीपणे राबवण्याचा होता.
आरोग्य, शिक्षण, कृषी व पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगतीआढावा बैठकीत आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधा या प्रमुख क्षेत्रांतील वडवणी तालुक्याच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मा. सुमन चंद्रा यांनी तालुक्याने विविध निर्देशांकांमध्ये केलेली सुधारणा ही प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा परिणाम असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
आरोग्य साथी” उपक्रमाचे विशेष कौतुकआरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या “आरोग्य साथी” या नाविन्यपूर्ण उपक्रमावर विशेष भर देण्यात आला. स्थलांतरित ऊसतोड कामगारांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी यासाठी महिला स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गाव, वाडी, वस्ती, शेतमजूर तसेच स्थलांतरित कामगारांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होत असून हा उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे मत मा. संचालिकांनी व्यक्त केले.
यापुढील काळात अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासाठी विभागांमधील समन्वय, अभिसरण आणि स्पर्धा ही त्रिसूत्री नीती अवलंबण्याचा सल्लाही त्यांनी दिला.शिक्षणात मुलींची गळती रोखण्यात यशशिक्षण विभागांतर्गत मानवविकास योजनेद्वारे राबवण्यात आलेल्या उपक्रमांमुळे मुलींच्या शिक्षणात सकारात्मक बदल घडून आला आहे.
शाळेत जाण्यासाठी मोफत बस वाहतूक व एक हजारहून अधिक सायकलींचे वाटप केल्यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. अनेक मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.कृषी क्षेत्रात रेशीम शेतीवर भरकृषी क्षेत्रातील प्रगतीवर चर्चा करताना मनरेगा आणि रेशीम शेतीमधील यशस्वी समन्वय अधोरेखित करण्यात आला.
रेशीम उत्पादनात राज्यात प्रथम क्रमांक कसा मिळवता येईल, यासाठी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादन, प्रक्रिया, विक्री आणि शाश्वत व्यवसाय उभारण्यावर भर देण्यात आला.यासोबतच “सौर ग्राम संकल्पना” प्रभावीपणे राबवून प्रत्येक ग्रामपंचायतीत नवीकरणीय ऊर्जेचे लाभार्थी वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले.गावपातळीवरील प्रत्यक्ष पाहणीआढावा बैठकीनंतर मा. संचालिका सुमन चंद्रा, मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व विभागप्रमुखांनी वडवणी तालुक्यातील विविध गावांना भेट देत प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी केली.यावेळी अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र – कुप्पा, उपकेंद्र – परडी माटेगाव येथे भेट देण्यात आली.
तसेच रेशीम शेतीला अधिक चालना देण्यासाठी ग्रामपंचायत चिंचाला येथे शेतकरी व स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.२०२६ पर्यंत वडवणी ‘आदर्श तालुका’ करण्याचा संकल्पया दौऱ्यादरम्यान मा. जिल्हाधिकारी यांनी भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती दिली.
बचत गटांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी ‘बचत भवन’, स्थानिक उपजीविकेला चालना देण्यासाठी ‘उमेद मार्ट’, आरोग्य साठी 2.0, ऊसतोड कामगारांच्या बालकांसाठी निवासी वसतिगृह, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा मॉडेल शाळा म्हणून विकास, तसेच १५ नवीन अंगणवाड्यांना मंजुरी देण्याचा समावेश भविष्यातील कार्ययोजनेत करण्यात आला आहे.
प्रशासनाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे २०२६ पर्यंत वडवणी तालुक्याला एक आदर्श तालुका म्हणून विकसित करण्याचा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.वडवणी तालुक्याची ही यशोगाथा आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत इतर तालुक्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण विकासाचा नवा आदर्श उभा करत आहे.









