---Advertisement---

ठाकरे गटाची खेळी यशस्वी? मनसे-MVA युतीमुळे महापालिकांत नवे समीकरण

On: December 19, 2025 11:13 AM
Follow Us:
---Advertisement---

मनसे अखेर महाविकास आघाडीत; वसई–विरारपासून युतीचा प्रयोग, भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र

Municipal Election 2026 Update:राज्यातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, १५ जानेवारी २०२6 रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, युती-आघाड्यांच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांत ज्या पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय आघाड्या पाहायला मिळाल्या, तसाच प्रयोग आता महापालिका निवडणुकांत होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेषतः ठाकरे बंधूंची संभाव्य युती, काँग्रेसचा स्वबळाचा नारा आणि महाविकास आघाडी सर्वत्र एकत्र लढणार की स्थानिक पातळीवर वेगवेगळे निर्णय घेतले जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.यातच एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली असून, मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अखेर महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. विशेष म्हणजे ही घोषणा थेट काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे.

काँग्रेस बहुतेक ठिकाणी स्वबळावर, स्थानिक युतीला मोकळीक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने बहुतेक महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी २५ डिसेंबर रोजी मुंबईत काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत बहुतांश महापालिकांमधील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्या ठिकाणी कोणत्या पक्षाशी युती करायची, याचे पूर्ण अधिकार काँग्रेस प्रदेश नेतृत्वाने स्थानिक पातळीवरील जिल्हा व शहर नेतृत्वाला दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक महापालिकेतील राजकीय परिस्थितीनुसार स्वतंत्र निर्णय घेतले जाणार आहेत.

निधीची चणचण; खर्चाची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर

पूर्वी महापालिका निवडणुकांच्या काळात प्रदेश काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक ‘रसद’ पुरवली जायची. मात्र सध्या पक्ष आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचारासाठी लागणाऱ्या निधीची जबाबदारी स्थानिक पातळीवरच उचलावी लागणार आहे, असे सूचित करण्यात आले आहे.पक्षातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नेते आपापल्या प्रभावक्षेत्रात प्रचाराचा खर्च करत आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे राज्यातील मोठ्या नेत्यांकडून प्रदेश काँग्रेसला मिळणारी मदत आता जवळपास बंद झाल्याचे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. तरीही प्रत्येक महापालिकेतील काँग्रेस उमेदवारांना काही प्रमाणात प्रचारसाहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वसई–विरारमध्ये भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र

वसई–विरार महापालिकेत मात्र चित्र वेगळे पाहायला मिळत आहे. येथे भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीने येथे बहुजन विकास आघाडी (बविआ) ला सोबत घेण्याचा निर्णय घेतला असून, विशेष बाब म्हणजे मनसेलाही याच आघाडीत सामावून घेण्यात आले आहे.आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी स्वतंत्रपणे लढले होते. परिणामी मतविभाजन झाले आणि त्याचा थेट फायदा महायुतीला झाला. महायुतीने येथे तीनही विधानसभा जागा जिंकल्या होत्या. ही चूक पुन्हा होऊ नये, यासाठी यावेळी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

उद्धव सेनेची पुढाकाराची भूमिका

महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने पालिका निवडणूक एकत्र लढवण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने बुधवारी उद्धव सेनेच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि युतीबाबत सविस्तर चर्चा केली.

आम्ही मनसेला महाविकास आघाडीत घेत आहोत’ – काँग्रेसची स्पष्ट भूमिका

या भेटीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा आणि नेते विजय पाटील यांनीही हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. या बैठकीनंतर हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना, “आता आम्ही एकत्र लढणार आहोत,” असे स्पष्ट केले.काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी युतीबाबत मोठी घोषणा करत सांगितले की,“आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. वसई–विरारची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, आम्ही मनसेला महाविकास आघाडीत घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

महापालिका निवडणुकांत नवे राजकीय समीकरण?

मनसेचा महाविकास आघाडीत समावेश ही राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. येत्या महापालिका निवडणुकांत हा प्रयोग इतर शहरांतही होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र येण्याचा हा प्रयोग यशस्वी ठरतो की नाही, हे निकालांनंतर स्पष्ट होणार आहे.महापालिका निवडणुकांनी राज्यातील आगामी राजकीय दिशा ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने, येत्या काही आठवड्यांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment